शिवचरित्रमाला - भाग १४४ - रायगड पाहुण्यांनी फुलू लागला

इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहूनरायगडास येण्यास निघाला. तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात येऊन पोहोचला.त्याचेबरोबर आठ माणसे होती. त्यात एक श्यामजी नावाचा गुजराथी व्यापारी होता.राज्याभिषेकाचा मुहूर्त होता दि. ६ जून१६७४ . म्हणजे हेन्री खूपच लौकर निघाला होता का ? कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारीहिताची काहीकामे शिवाजी महाराजांकडून मंजुरी मिळवून करावयाची होती.

हेन्री आगरकोटला दि. १३ मे रोजी दिवस मावळताना पोहोचला , तेव्हा आगरकोटाला असलेले प्रवेशद्वार म्हणजे वेस बंद झालेली होती. रहदारी बंद! हेन्रीला मुद्दाम ही वेस उघडून आतघेण्यात आले. तेव्हा त्याने आगरकोटच्या पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला सहज विचारले , की 'अजून दिवस पूर्ण मावळला नाही. तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ? त्यावर डे.गव्हर्नरने उत्तर दिले की , ' अहो , तशी काळजी आम्हाला घ्यावीच लागते. कारण तो शिवाजीकेव्हा आमच्यावर झडप घालील अन् आगरकोटात शिरेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही हीदक्षता घेतो. ' यातच शिवाजी महाराजांचा दरारा आणि दहशत केवढी होती हे व्यक्त होते. 


नंतर हेन्री रायगडावर पाचाड या छोट्या गावी येऊन पोहोचला. रायगडच्या निम्म्या डोंगरावर हे पाचाड गाव आहे. हेन्रीची उतरण्याची व्यवस्था रामचंद निलकंठ अमात्य यांनी तेथे केली होती. दि. १९ मे १६७४ या दिवशीची ही गोष्ट. हेन्रीने मराठी अधिकाऱ्यांस विचारले की , 'शिवाजीराजे यांना लौकर भेटावयाचे आहे. पुढे राज्याभिषेकाच्या गदीर्त ते जमणार नाही. तरी ते आम्हांस केव्हा भेटू शकतील ?' त्यावर अधिकाऱ्याने उत्तर दिले की , ' महाराज प्रतापगडावरश्रीभवानी देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. चार दिवसांनी परततील. भेटतील. '

खरोखरच महाराज पालखीतून गडावरून प्रतापगडाकडे निघाले होते. राज्याभिषेकापूवीर्श्रीभवानी देवीचे दर्शन घेऊन तिला सुवर्णछत्र आणि अलंकार अर्पण करण्यासाठी महाराजप्रतापगडास गेले. दि. २१ रोजी त्यांनी श्रींची यशासांग महापूजा केली. विश्वनाथभट्ट हडप यांनी पूजाविधी समंत्र केला. श्रीदेवीस सोन्याचे छत्र आणि अत्यंत मौल्यवान असे अलंकार महाराजांनीअर्पण केले. 


महाराज दि. २२ मे रोजी रायगडास परतले. हेन्री वकील वाटच पाहात होता. त्याच्याबरोबरनारायण शेवणी सुखटणकर हा दुभाषा वकील आलेला होता. आधी ठरवून हेन्री महाराजांचे भेटीस गेला. त्याने व्यापारविषयक सतरा कलमांचा एक मसुदा अमात्यांच्या हस्ते महाराजांस सादर केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या काही मागण्या विनंतीच्या शब्दात त्यात होत्या. त्यात शेवटचे कलम असे होते की , ईस्ट इंडिया कंपनीची नाणी मराठी राज्यातही चालावीत! महाराजांनी हे नेमके कलम ताबडतोब नामंजूर केले. त्यांची सावधता आणि दक्षता येथे चटकन दिसून येते. बाकीची कलमे थोड्याफार फरकाने त्यांनी मंजूर केली.

हेन्री डायरी लिहीत होता. त्याने आगरकोटपासून पुढे रायगडावर झालेल्या आणि पाहिलेल्याराज्याभिषेकापर्यंत जेजे घडलेले पाहिलेले ते डायरीत लिहून ठेवले आहे. ही डायरी सध्या लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत मला पाहावयास मिळाली. त्या डायरीत हेन्रीची साक्षेपी दृष्टी दिसून येते. 


रायगड आणि पाचाड पाहुण्यांनी फुलू लागला. पाचाडास महाराजांनी एक मोठा भुईकोट वाडाबांधलेला होता तो मुख्यत: जिजाऊसाहेबांसाठी होता. या वेळी जिजाऊसाहेब खूपच थकलेल्या होत्या. त्यांची सर्व आस्था आणि व्यवस्था पाहण्यासाठी नारायण त्र्यंबक पिंगळे या नावाचा अधिकारी नेमलेला होता. राज्याभिषेक सोहाळ्यासाठी अर्थातच जिजाऊसाहेबांचा मुक्काम रायगडावरील वाड्यात होता. 


हे दिवस ज्येष्ठाच्या प्रारंभीचे होते. अधूनमधून पाऊस पडतही होता. त्याच्या नोंदी आहेत.वैशाखात इंग्रजांचे इतर दोन वकील रायगडावर महाराजांच्या भेटीस येऊन गेले होते. त्यावेळी पावसाने त्यांना चांगलेच गाठले. त्या वकीलांच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट सांगतो. ते वकीलबोलणी करण्याकरता जेव्हा मुंबईहून रायगडावर येण्यास निघाले , तेव्हा मुंबईच्या इंग्रज डेप्युटीगव्हर्नरने वाटेवरच त्यांना एक लेखी निरोप पाठविला की , ' त्या शिवाजीराजाशी अतिशय सावधपणाने बोला. ' इंग्रजांची शिवाजीमहाराजांच्या बाबतीतली ही दक्षता फारच लक्षवेधी आहेनाही! 


रायगडावरील धामिर्क विधींना लवकरच प्रारंभ झाला. श्रीप्राणप्रतिष्ठा आणि नांदीश्राद्ध इत्यादीविधी सुरू झाले. गागाभट्ट आवश्यक तेथे मार्गदर्शन करत होते. कुलउपाध्याय राजोपाध्ये मुख्यपौरोहित्य करीत होते. यावेळी निश्चलपुरी गोसावी हेही आपल्या शिष्यगणांसह गडावर होते. त्यांनी पूवीर्पासून केेलेल्या अपशकुनविषयक सूचना महाराजांनी शांतपणे ऐकून घेतल्या पण ठरविलेल्या संस्कारविधींत बदल केला नाही. अपशकुन वगैरे कल्पनांवर महाराजांचा विश्वासचनव्हता. ते अंधश्रद्ध नव्हते. 


हेन्री ऑक्झिंडेन आपल्या डायरीत सर्व सोहाळ्याचे वर्णन विचारपूस करून लिहीत होता. डचप्रतिनिधी इलियड यानेही काही लिहिलेले सापडले आहे. पण आमच्या मंडळींनी या अलौकिक महत्त्वाच्या ऐतिहासिक सोहाळ्याचे यथासांग वर्णन करून ठेवलेले नाही. निदान अद्यापतरी तसेसापडलेले नाही. लौकरच महाराजांची मुंज होणार होती! या वेळी महाराजांचे वय ४४ वर्षांचे होते.