शिवचरित्रमाला - भाग ६ - तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला!


शहाजीराजे पकडले गेले होते. त्यांच्या हातापायात बेड्या होत्या. त्यांना मदुराईहून विजापूरला आणलं अफझलखानानं शहाजीराजांना मकई दरवाजाने विजापूर शहरांत आणलं. अन् भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून मिरवित नेलं. त्यांच्या हातापायात बेड्या होत्याच. या अशा अपमानकारक स्थितीतच अफझलखान शहाजीराजांची या भर वरातीत कुचेष्टा करीत होता. तो मोठ्याने शहाजीराजांना उद्देशून म्हणत होता. 

ये जिंदाने इभ्रत है! 

खान हसत होता. केवढा अपमान हा! राजांना ते सहन होत नव्हतं. पण उपाय नव्हता. राजे स्वत:च बेसावध राहिले अन् असे कैदेत पडले. जिंदाने इभ्रत! म्हणजे मोठ्या मानाचा कैदी. शिवाजीराजे स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते. त्यांनी बंड मोडले होते. म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी! आता शिक्षाही तशीच वाट्याला येणार. हे उघड होतं. सत् मंजिल या एका प्रचंड इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद आदिलशहाने डांबलं. आता भविष्य भेसूर होतं. मृत्यू! 

आणि उमलत्या कोवळ्या स्वराज्याचाही नाश! जिजाऊसाहेब यावेळी राजगडावर होत्या. शहाजीराजांच्या कैदेची बातमी त्यांना समजली त्याक्षणी त्यांच्या मनात केवढा हलकल्लोळउडाला असेल! गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्तांनी उडविलेली त्यांना माहीत होती. प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते. आता शहाजीराजांना जिवंत सोडवायचं असेल तर एकच मार्ग होता.आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं.! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ पुरंदर गड बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्यादीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. (दि. ८ ऑगस्ट १६४८ 

अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणीसंतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता नाही का 

पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता मुघलबादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी असा आदिलशाहला शह टाकण्याकरता. 

राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं कीशहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचाकायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं. 

हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वषीर्चं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे त्याच्याच अंगाशी आला. कारणसमोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती. 

मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकंपिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकटझाली. मनगटातलं पोलादी सार्मथ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपचं. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहूनइतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.